नवी दिल्ली - इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांपैकी ३८ जणांचे मृतदेह सोमवारी भारतात आणण्यात आले. मात्र, यापैकी एक मृतदेह आणणे अद्याप बाकी आहे. यावर बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी 'डीएनए चाचणी पूर्ण झ्याल्यानंतर राहिलेला एक मृतदेहदेखील इराकहून भारतात आणण्यात येईल,' असे म्हटले. सिंह म्हणाले, "केवळ राजू यादव यांच्याच मृतदेहाचे अवशेष इराकहून भारतात आणणे बाकी आहे. त्यांचे डिएनए केवळ ७० टक्केच जुळले आहेत. काही दिवसांपूर्वी, आम्ही पुन्हा त्यांचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले आहेत. चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह भारतात आणण्यात येतील. बिहारवरून दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बिहारचे पाच मृतदेह हस्तांतरित करण्यासाठी ते बिहारला गेले होते.