नागपूर - मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील कार्यकर्तेच वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. कारण कार्यकर्त्यांची ट्रेन जवळपास ४ ते ५ तास उशीराने धावते आहे. शिवाय ट्रेनच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. मुंबईला भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्मक्रमाला राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते येतील असा अंदाज धरुन भाजपने नियोजन केले आहे. नागपुरातूनही पाच हजार कार्यकर्ते नेण्याचे नियोजन होते. यासाठी भाजप स्पेशल ट्रेन करण्यात आली. पण शहर भाजपने बुधवारी सकाळी चुकीची वेळ कार्यकर्त्यांना दिल्याने गोंधळ झाला. अवघे १५ ते २० कार्यकर्ते घेवून ही ट्रेन सकाळी सुटली. त्यानंतर दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. मात्र ती ट्रेनही तब्बल साडेचार ते पाच तास उशीराने होती. शिवाय मार्गातही बदल करण्यात आल्याने ही ट्रेन आता वेळेवर मुंबईला पोहोचू शकणार नाही. सध्या ही ट्रेन सुरतमध्ये आहे. मुंबईत पोहचायला जवळपास ४-५ तासाचा अवधी लागणार आहे.